आषाढी पायी वारीचे मी अनुभवलेले सोनेरी क्षण

आषाढी  पायी वारी ११ जून २०२३ ते २८ जून

 वारी  हा शब्द यापूर्वी बऱ्याच लोकांच्या मुखातून ऐकलेला होता. दरवर्षी आळंदीवरून माउलींच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरला विठोबाच्या ओढीने होत असते. या गोष्टी ऐकणे आणि अनुभवणे यात फार फरक आहे. प्रत्येकाचा या वारीचा अनुभव वेगळा असावा. त्याचप्रमाणे मलाही हा अनुभव प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला तो यंदाच्या वारीत. माझे कुटुंब या वारीत सहभागी झाले. ११ जूनला आम्ही नाशिकवरून शिवशाही बसने ठीक ९ वाजता ठक्कर बाजार बस स्थानकावरून आळंदीला जाण्यासाठी निघालो. दुपारी २.३० ते ३ च्या दरम्यान आम्ही आळंदीत पोहचलो. आमचे गुरुबंधू यांच्याकडे आमची राहण्याची सोय करण्यात आली होती.तिथे पोहचल्यानंतर आम्ही आमच्याकडे असलेले सामान त्यांच्या घरी ठेवले व फ्रेश होऊन लगेचच माउलींच्या मंदिरात पोहचलो. आमच्या बरोबर आमचे गुरुबंधू ,गुरुभगिनीही आल्या होत्या. गप्पा गोष्टी करत मागील आठवणींना उजाळा देत रमत गमत आम्ही मंदिराच्या वाटेला केव्हा पोहचलो कळलेही नाही . मंदिरात माउलींच्या पालखीच्या प्रस्थानाची तयारी चालू होती. त्यामुळे मंदिराच्या प्रवेश द्वारात गर्दी असल्यामुळे आम्ही नगर प्रदक्षिणा मार्गाने मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला. चालत चालत आम्ही माउलींच्या आजोळापर्यंत पोहचलो. पुढे मात्र प्रचंड गर्दी होती त्यामुळे आम्ही तिथेच थांबलो. पोलीस कर्मचारी सांगत होते की मंदिरात खूप गर्दी आहे आत जागा नाही त्यामुळे पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका. त्यावेळी आम्ही माघारी फिरून स्मारक मंदिराच्या ठिकाणाहून हा सोहळा पाहण्याचा निर्णय घेतला. 

आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. आळंदी या गावात ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी आहे. जेथे चैतन्याचा पुतळा स्वतः विराजमान आहे. अशा ठिकाणी कोणत्याही विचारांची व्यक्ती गेली तरी तेथील चैतन्यलहरींचा प्रवेश त्यात झाल्यावाचून राहणार नाही. फक्त ती व्यक्ती अंतर्मुख असावी. 

या क्षणांचे भागीदार होण्याचा मला लाभ मिळाला हे माझे परम भाग्य आहे. 

आळंदीत ठीक ६ वाजता आम्ही स्मारक मंदिराच्या समोर बसलो. ६.३० ते ७ च्या दरम्यान दिंड्यांचे आवारात आगमन सुरु झाले . दिंडी नं २७,२६,२५,२४,२३,२२,२१,२०,१९,१८,१७,१६,१५,१४,१३,१२,११,१०,९,८,७,६,५,४,३,२,१,अशा क्रमाने एका पाठोपाठ दिंड्यांचे प्रस्थान मंदिराच्या आवारात झाले व शेवटी ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आला व माउलींच्या पालखीचे आगमन झाले . प्रथमदर्शनी दिंडीतील व्यक्ती ‘माउली माउली’ असा जयघोष करत आल्या . नंतर एकापाठोपाठ असे दोन घोडे नाचत नाचत त्यापाठोपाठ आले नंतर रस्त्यावर रांगोळी काढत काढत आली. एका हाताने इतकी भरभर रांगोळी ती काढत होती . ते बघून मी थक्क झाले. दिवाळीच्या दिवशी घरासमोर महिला ४ -४ तास रांगोळी काढतात तरी अंगणभर रांगोळी होत नाही. ह्या मुलीने एकटीने पूर्ण नगरप्रदक्षिणा रस्त्यावर रांगोळी काढली . दिंडीचा हा सर्व थाट आम्ही आमच्या डोळ्यात साठवत होतो. अवघ्या महाराष्ट्राचे लोकजीवन ,संस्कृती ,पोशाख राहणीमान याचे दर्शन या दिंड्यांतील लोकांकडे बघून होत होते . ज्ञानोबा माउली तुकाराम .विठोबा रखुमाई चा गजर करत आळंदी गाव टाळ मृदूंगाच्या आवाजाने दुमदुमून जाते . टाळांच्या घर्षणातून सुद्धा माउली माउली हाच ध्वनी कानांत घुमतो.  शेवटी सर्व दिंड्या आवारात स्थिरावतात .  इतरही गावोगावच्या दिंड्या येथे जमतात. तेथील भक्तिमय वातावरण ,प्रचंड प्रमाणावर जमलेला लोकसमुदाय याने आळंदी गाव फुलून गेले होते . रात्रभर ह्या दिंड्या आळंदी गावात मुक्कामाला असतात. व दुसऱ्या दिवशी सकाळी ६ ते ६. १५ च्या दरम्यान ह्या दिंड्यांचे प्रस्थान पंढरपूरच्या वाटेने होणार होते. हे सोनेरी क्षण डोळ्यात साठवून आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी परतलो. फ्रेश होऊन आम्ही जेवण केले . ताईंनी इतका छान स्वयंपाक केला होता की आईच्या हातचे जेवण करत आहे असे वाटत होते. अगदी प्रेमाने त्यांनी आम्हाला जेऊ घातले. कुठे परक्या जागी आम्ही आहोत असा लवलेशही मनाला जाणवला नाही. थोड्या गप्पा मारून आम्ही झोपी गेलो. 

पहाटे ३ वाजताच पुन्हा दिंड्यांची लगबग सुरु झाली. ५ वाजता आम्ही उठून तयारी केली. ठीक ६.३० ला अनुश्री ताई व त्यांचे यजमान आले नाष्टा,चहा घेऊन आम्ही दिंडीत सहभागी होण्यासाठी निघालो. त्यावेळी गुरुभगिनींची  मुलगी प्रसन्ना पण आली ती पण आमच्या बरोबर दिंडीत येणार होती . मग आम्ही सर्वजण मोशी चौकात दिंडीत सहभागी झालो. ४८ क्रमांकाच्या परभणीच्या दिंडीत आम्ही सहभागी झालो त्यात  आम्हाला आमचे इतर गुरुबंधू निखिल, भास्कर ,मोहन ,गिरीश ,मीनाताई, संजय महाराज हे सर्वजण भेटले . त्यांच्याबरोबर आम्ही चालायला सुरुवात केली . दिंडीची ती स्वयंशिस्त ,कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन ,एकात्मता ,सर्वधर्मसमभाव, कुठलाही जातीभेद नाही, स्त्रीपुरुषभेद नाही .वृद्धांबरोबर बालगोपाळांनाही तेवढाच आनंद , सर्वांच्या ध्यानाचा विषय फक्त पांडुरंग ,ईश्वरप्रणिधानाची भावना सर्वांची सारखीच हे क्वचितच एखाद्या संप्रदायात बघायला मिळेल. एकाच ध्येयायाकडे ध्यान लागलेला समुदाय ज्ञानेश्वर माउली ,तुकोबाराय,विठोबा रखुमाई गजर करत चालू लागतो. या सर्व गुणांचा आपल्या व्यक्तिमत्वावर नक्कीच परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. 

दिवसभर दिंडी रस्त्यावरून पायी चालते. जागोजागी वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळ्या गावातील लोकसमुदाय यथाशक्ती  दिंडीसाठी पाणी,अल्पोपहार,जेवण यांचे आयोजन करतात. देताना कुठलाही भेदभाव नाही. जी व्यक्ती हात पुढे करील त्या हातावर अन्नपदार्थ ठेवले जातात हे बघून समाधान वाटले. या सर्वांचा पाहुणचार घेत घेत दिंडी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान विश्रांतवाडी येथे पोहचते तेथे दिंडीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जेवणाचे आयोजन केले जाते. १ ते १.३० तास दिंडी या जागेवर थांबते. विश्रांतीनंतर पुन्हा चालू लागते. मध्ये भारतीय सेनेतील जवान देखील छावणी च्या समोर सरबत ,काही ठिकाणी चहाचे आयोजन करतात ,वारकऱ्यांबरोबर फुगडी खेळतात .यावरून हे लक्षात आले की  त्यांनादेखील आपल्या या भारतीय संस्कृतीचा किती अभिमान आहे . हे जवान देशाचे रक्षण तर करतातच पण या सेवेत सुद्धा सहभागी होतात व या आनंदी क्षणांचे साक्षीदार होतात. 

पुढे दिंडी चालत चालत संगमवाडी येथे थांबते . पालखी दर्शनासाठी १ ते १. ३० तास थांबते. त्यावेळी देहू हुन संत तुकारामांची पालखी निघते. येथे आकाशातून हेलिकॉप्टरने पालखीवर पुष्पवर्षाव केला जातो . नंतर देहू भागातून निघालेल्या सर्व दिंड्या येथे एकत्र जमतात. पुढे एकत्रच माऊलींची पालखी व संत तुकोबारायांची पालखी पंढरपूरकडे वाटचाल करते. यानंतर  दिंडीचा मुक्काम पुण्यात असतो . दुसऱ्या दिवशी दिंडीचे प्रस्थान पंढरपूरकडे होते.

एवढे सर्व आनंदाचे क्षण डोळ्यात साठवून आम्ही परतीचा मार्ग स्विकारला . 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You might like

© 2024 Sanskrit Sarita - WordPress Theme by WPEnjoy